चिकुनगुन्याचा संधिवात

चिकुनगुन्याचा संधिवात

विषाणूंमुळे सांध्याच्या आतल्या आवरणाला ( सायनोव्हियम ) सूज येऊन चिकनगुनिया होतो. नाकात व्हायरसमुळे सर्दी-पडसे होते . तसे १९५३ मध्ये टांझानिया आणि मोझाम्बिक देशांच्या सीमेवरील माकोडे पठारावर हा आजार प्रथम सापडला. माकोडे भाषेतल्या कनगुन्याला या क्रियापदावरून हा शब्द तयार झाला . चिकनगुनिया म्हणजे रुग्णाला वाकवून टाकणारा आजार.

चिकनगुनियाचा डास

चिकनगुनिया हा आशिया आफ्रिका खंडातील संधिवाताचा विशेष व्हायरस , ते सांध्यांमध्ये आणि आजूबाजूला वाढतात . या व्हायरसमधल्या अनुवांशिक बदलांमुळं चिकनगुनियाची तीव्रता वाढत चालल्याचे दिसते . चिकनगुनिया वायर्स हा ईडीस इजिप्ती नावाच्या डासांमध्ये वाढतो. जागतिक तापमानवाढीमुळे हा डास पुन्हा कार्यरत झाला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वच्छ पाण्यात वाढतो. आणि दिवस विशेषतः सकाळ-संध्याकाळी चावा घेतो . ईडीस इजिप्ती अनेक लोकांचे थोडे थोडे रक्त पितो . त्यामुळे एका वेळी एकाच घरातील अनेक मंडळी आजारी पडतात . डासाच्या चाव्यानंतर चार-पाच दिवसांत चिकनगुनियाची लक्षणे दिसतात

लक्षणे

अचानक थंडी वाजून, ताप येऊन सर्व सांधे आखडणे हे चिकनगुनियाचे प्रमुख लक्षण आहे. कधी ताप उतरतो आणि पुन्हा येतो . कधी त्वचेवर हलकेसे पुरळ उठते.
या संधिवातामुळे बोटांची परे , मनगट , घोटे आणि क्वचित गुडघ्याचे सांधे सुजतात . आणि रोग्याला अगदी जखडून टाकतात . वेदनेमुळे रोगी अगदी बेजार होऊन ज़ातो . हालचाल करता येत नाही .

उपद्रव

चिकनगुन्या हा सर्दीसारखा आठवडाभरात बारा होणारा आजार असला तरी सुरुवातीच्या दिवसात मेंदूची सूज (बेहोशी भ्रम, फिट्स, अर्धांगवायू), मज्जातंतूचे दोष (मुठी वळता ना येणे अंधत्त्व ) मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणे, रक्तस्त्राव असे उपद्रव हि दिसून आले आहेत . काही रुग्णांची सांधेदुखी फार तीव्र असते आणि आजारही प्रदीर्घकाळ चालतो. सुरुवातीचे दुखणे जोरदार असले आणि महिनाभरापेक्षा जास्त काळ चालू राहिले तर ते आणखी लांबण्याची शक्यता जास्त. बहुधा चारपेक्षा जास्त सांधे दुखतात . विशेषतः घोटे , गुडघे, मनगट आणि हात-पायांची बोटे दुखतात, आणि सुजतात. संधिदुखी कमी-जास्त होत राहते. काही रोग्यांमध्ये साध्यांच्या आजूबाजूला सूज येते. सुजेमुळे आतली कुर्चा खराब होऊन सांधा बिघडल्याची उदाहरणे आहेत. काही रुग्णांमध्ये चिकनगुन्यानंतर ऱ्हुमॅटॉइड आमवात निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

उपचार

बहुतांश रोगी साद्या वेदनाशामक औषधांनी सुधारतात . लक्षणे कमी व्हावीत म्हणून सूज कमी करणारी वेदनाशामके वापरली पाहिजेत. १९८४ साली २० रुग्णांमध्ये क्लोरोक्वीनने उपयोग झाल्याचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता . त्यानंतर अनेक वर्षे या आजाराची साठाच नसल्याने काही संशोधन झाले नाही. क्लोरोक्वीनचा उपयोग दिसायचा असेल तर त्यासाठी निदान ३ ते ६ महिने तरी औषध घेतले पाहिजे.

प्रतिकार

दुर्दैवाने या विषाणूची अजून नेमके औषध माहित नाही, तसेच लसही सापडली नाही. डासांचा नायनाट हाच खरा प्रतिकार. त्यासाठी डासांसोबत अळींचाही प्रतिबंध केला पाहिजे. हा डास रात्री चावत नसल्याने मच्छरदाणीचा उपयोग होत नाही. दिवस अंगभर कपडे घालावेत. उघड्या त्वचेवर कडुलिंबाचे तेल(ओडोमॉस ) लावावे. स्वच्छ पाणीही उघडे साठणार नाही (कूलर, फुलदाणी, कुंड्या,डबे, बाटल्या,प्लास्टिक पिशव्या, टायर, नारळाच्या करवंट्यामध्ये) असे पाहावे. डासांच्या नियंत्रणासाठी शासकीय सूचना कटाक्षाने पाळाव्यात.